कर्नाटक गुळावर बंदी
कोल्हापूर : काही दिवसांपूर्वी योग्य दरासह कर्नाटक गुळावर बंदी आणण्यासाठी गूळ उत्पादकांनी गूळ सौदे बंद पाडले होते. मात्र मागण्या मान्य झाल्यामुळे उत्पादकांनी एक पाऊल मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. कोल्हापूरच्या गुळाला 3400 ते 3600 पर्यंतचा भाव मिळाल्याने तब्बल 5 दिवसानंतर मार्केटमधील गूळ सौदे पुन्हा सुरु झाले आहेत. तर आजपासून कोल्हापूर मार्केटमध्ये कर्नाटकी गुळाला बंदी असून कोल्हापूर उत्पादक ज्यादा दर मिळाल्याने समाधान व्यक्त करत आहेत.
गुळाचा दर घसरत चालल्याने कोल्हापूरातील गुऱ्हाळघरे अखेरची घटका मोजू लागली होती. त्यातच कर्नाटकात तयार झालेला गूळ कोल्हापूरचा गूळ म्हणून विकला जात असल्याची बाब शेतकऱ्यांच्या समोर आली होती. यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी प्रशानसनासमोर केली होती.तसेच गुळाला किमान हमीभाव मिळावा आणि शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक थांबावी यासाठी शेतकरी आक्रमक झाले होते.जोपर्यंत गुळाला 3700 रुपयांपेक्षा जास्त भाव मिळत नाही तोपर्यंत गुळ सौदे सुरु न करण्यावर गुळ उत्पादक शेतकरी ठाम होते.कर्नाटकी गुळ कोल्हापुरी ब्रँड म्हणून विकणाऱ्यांवर थेट फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी बाजार समितीला दिले आहेत.भरारी पथक नेमण्यासह गुळाची गुणवत्ता तपासण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारणीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्या आहेत. याशिवाय कर्नाटकच्या गुळावर कोल्हापूर मार्केट यार्डमध्ये बंदी ठेवण्यात आली आहे.