कोल्हापूर- कसबा बावडा परिसरातील विविध मळ्यात गव्यांच्या कळपाची वावर सुरु असतानाच शनिवारी संध्याकाळी उशिरा गवे वडणगे परिसरात दिसून आले. हा पाच गव्यांचा कळप आहे. वडणगे -पोवार पाणंद मार्गावर बंडगर मळ्यातील ऊसाच्या शेतात गव्यांचा कळप ट्रॅक्टरने नांगरणी करण्यासाठी गेल्यानंतर बाळासाहेब काटे यांना दिसून आला. शेतकऱ्यांचा आणि ट्रॅक्टरचा आवाज आल्याने गव्यांनी पुन्हा एकदा ऊसाच्या शेतीत पळ काढला.
गव्यांच्या दर्शनाने भागात ऊसतोड करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याच परिसरात ऊसतोड मजुरांनी झोपड्या बांधून मुक्काम केला आहे. गेल्या दोन दिवसांपासून कसबा बावडा परिसरात गव्यांचा कळप दिसून येत होता. नदीकाठचा परिसर तसेच मुबलक चारा असल्याने गव्यांनी या पट्ट्यात तळ ठोकला असल्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरीकडे, मानवी वस्तीत गवे येऊ नयेत, यासाठी वनविभागाकडून डोळ्यात तेल घालून पहारा देण्यात येत असला, तरी गवे शेतातून मुक्काम सोडत नसल्याने यंत्रणेची झोप उडाली आहे.