कोल्हापूर – कोल्हापूरच्या नावावर कर्नाटकचा गुळ विकणाऱ्यांवर थेट फसवणुकीचे गुन्हे दाखल करा, असा सक्त आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीला दिला आहे. कर्नाटकच्या गुळाला प्रवेश देऊ नका. कमी प्रतीच्या गुळाची घुसखोरी रोखण्यासाठी उद्या सोमवारपासून बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर भरारी पथक नेमून कारवाई करा, अशी सूचना त्यांनी बाजार समितीला दिली.
कोल्हापूरच्या गुळाची गुणवत्ता चांगली आहे. त्यामुळे बाजारात त्याला चांगला दर मिळतो. सध्या गुळाला सरासरी ३,७०० रुपयांचा दर मिळत आहे. त्यामुळे कर्नाटकमधील गुळ उत्पादक कोल्हापूरच्या नावावर आपला कमी दर्जाचा गुळ विकत आहेत. त्याचा फटका कोल्हापूरमधील गुळ उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. यात ग्राहकांचीही फसवणूक होते. तेव्हा गुणवत्तेनुसार गुळाला पैसे मिळाले पाहिजेत. कोल्हापूर बाजार समितीत कर्नाटकच्या गुळाला प्रवेश देऊ नये. कोल्हापूरच्या नावाखाली कर्नाटकचा गुळ विकणाऱ्यांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करा, असा आदेश जिल्हाधिकारी रेखावार यांनी दिला. कर्नाटकातील गुळावर कोल्हापूरचा शिक्का मारून तो विकला जातो. असे प्रकार थांबले पाहिजेत. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. बाजार समितीने त्यासाठी भरारी पथक स्थापन करावे. या पथकाने बाजार समितीच्या आवारात अशा प्रकारांना आळा घालावा, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
बाजार समितीत चांगल्या प्रतीच्या गुळालाच प्रवेश द्यावा. बाहेरच्या गुळाला प्रवेश देऊ नये, असे त्यांनी सांगितले. प्रतवारीनुसार गुळाला ३ हजार ३०० ते ४ हजार २०० रुपये इतका दर मिळतो. सरासरी ३,७०० रुपये एवढा दर गुळाला मिळत आहे. यामुळे कर्नाटकातील बोगस गुळाची घुसखोरी वाढली आहे. ती रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सक्त आदेश दिले आहेत.