कोल्हापूर- महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा पेटला आहे. दररोज आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असून महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. अशातच कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून आजपासून कोल्हापूरमध्ये जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. ही जमावबंदी १५ दिवसांसाठी लागू असेल.या काळात पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी असणार आहे.तसेच मिरवणुका आणि सभांनाही बंदी असेल.
अप्पर जिल्हा दंडाधिकारी दत्तात्रय कवितके यांनी काल ८ डिसेंबर रोजी जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल,असे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न आणि छत्रपती शिवाजी महाराज अवमानाच्या निषेधार्थ उद्या शनिवारी १० डिसेंबर रोजी कोल्हापुरातील शाहू समाधी स्थळावर आंदोलन करण्याची घोषणा जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली आहे.
कर्नाटक सरकारचे सीमावासियांवर होणारे अत्याचार यावर विचारविनिमय करण्यासाठी मविआ नेत्यांची बैठक झाली.या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीम, काँग्रेसचे सतेज पाटील, जयश्री जाधव,शिवसेनेचे संजय पवार यांच्यासह मविआचे नेते उपस्थित होते. कर्नाटक सरकारविरोधी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आणि ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आज ९ डिसेंबरपासून शुक्रवार २३ डिसेंबरपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू असतील.