कोल्हापूर- नियमित पाणीपुरवठा करण्याच्या मागणीसाठी कोल्हापुरातील हॉकी स्टेडियम परिसरात आज सकाळी शेकडो महिलांनी जोरदार घोषणाबाजी करत रस्तारोको केला. त्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. पाणीपुरवठा ठप्प असल्याने पाण्यासाठी महिलांना वणवण करावी लागत आहे.
तांत्रिक कारणाने गेल्या 15 दिवसांपासून एक दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. मात्र कोल्हापुरातील हॉकी स्टेडियम परिसरात गेल्या 15 दिवस पाणीच आलेले नाही. त्यामुळे या भागातील नागरिक आणि महिला आक्रमक झाले आहेत. यासंबधी सतत अधिकाऱ्यांना विचारणा करण्यात येत होती, मात्र तरी देखील कोणतीही दखल घेतली जात नसल्याने महिला थेट रस्त्यावर उतरल्या आहेत. यावेळी महिला पाण्याच्या कळशा आणि हांडे घेऊन थेट रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन केले. त्यावेळी त्यांनी आपला आक्रोश भररस्त्यावर दाखवला.