संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 31 January 2023

कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांचे प्रकृतीचे हाल – जयश्री खाडिलकर-पांडे

कोरोना आजारातून बरे करणे या बाबीला सरकार, रुग्णालये, डॉक्टर प्राधान्य देत आहेत आणि ते योग्यच आहे. पण त्याचबरोबर कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांकडेही लक्ष देऊन त्यांना वैद्यकीय सल्ला, उपचार वेळेत आणि रास्त दरात मिळवून देणे याकडेही आता सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे. कोरोना उपचारावर सर्व पुंजी खर्च झाली, आप्तजन बरे झाले, पण या उपचाराच्या दुष्परिणामांनी पुन्हा पछाडल्यावर जायचे कुठे? आर्थिक मेळ बसवून उपचार घ्यायचा कसा? हा प्रश्‍न या रुग्णांच्या कुटुंबियांना भेडसावत आहे. कोरोनातून मुक्त झालेले रुग्ण घरी परतल्यावर विविध व्याधींनी ग्रस्त होत आहेत. त्यावर अनेकदा महिना-दोन महिने उपचार घ्यावे लागत आहेत. या काळात प्रचंड आर्थिक ओढाताण होत असून सरकारने अशा रुग्णांना उपचारासाठी मदत करायला हवी.

कोरोना झालेल्या रुग्णांवर अत्यंत आक्रमक उपचार केले जातात. स्टिरीऑइड्स, रेमडेसीवीर, टोलीझुम्बाब या औषधांचा मारा होतो. या औषधांमुळे रुग्ण बरा होतो. परंतु या औषधांचे दुष्परिणाम नंतर दिसू लागतात. कोरोना बरा झाला, पण उजव्या पायाला लकवा मारला, स्मृती मंद झाली, मोठ्या आतड्याचे आजार सुरू झाले, किडनी काम करेनाशी झाली, निमोनिया झाला, डिहायड्रेशन झाले आणि त्यातून अनेक त्रास सुरू झाले अशा अनेक गंभीर तक्रारी उद्भवतात. यावर उपचार पद्धती ही प्रदीर्घ काळ चालते आणि या काळात आर्थिक स्थिती पूर्ण कोलमडलेली असते. अनेकांना फिजिओथेरपीची गरज असते. रोज रुग्णालयात जाणे-येणे परवडत नाही. थेरपिस्टला घरी बोलवायचे तर त्यांची फी भरणे अशक्य असते. पोटाच्या किंवा छातीच्या विकारांसाठी पुन्हा रुग्णालयात भर्ती व्हावे लागते. मूत्र संसर्गाचाही अनेकांना त्रास होतो. छोट्या घरात राहून उपचार करणे कठीण होऊन जाते. वेळेत आणि योग्य उपचार घेतले नाहीत तर आजार बळावतो.

कोरोना संसर्गाचा आणखी एक दुष्परिणाम बहुतेकांना जाणवतो तो म्हणजे शारीरिक आणि मानसिक थकवा येणे. यावर उपचार म्हणून रोज 30 मिनिटे सकाळच्या उन्हात बसायचे. प्राणायम करायचा, सूप प्यायचे आणि भिजवलेले बदाम, आक्रोड खायचे असे सांगितले जाते. पण हे सर्व सामान्यांच्या आवाक्याबाहेर असते. मधुमेहावरील नियंत्रण जाणे हा त्रासही उद्भवतो. पूर्व अ‍ॅलोपथी परवडत नाही म्हणून मधुमेहावर आयुर्वेदिक उपचार घेतले जात. मात्र आता आयुर्वेदिक औषधेही परवडत नाहीत इतकी महाग झाली आहेत. पगार नाही, नोकरी नाही, कोरोनाच्या उपचारात पुंजी संपलेली आणि नवीन आजार जडलेले अशी अनेक रुग्णांची स्थिती आहे. सरकारने या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन उपचारासाठी आर्थिक मदत देणे फार गरजेचे आहे.

Share with :
Facebook
Twitter
Pinterest
LinkedIn

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami