ठाणे :- करोनामुळे दोन वर्षाच्या कालखंडनंतर माघ पौर्णिमेनिमित्त आज मलंग गडावर मच्छिंद्रनाथ उत्सव साजरा करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मलंग गडावर आरती केली. यावेळी हिंदुत्वाचा नारा देत मलंग गडावर ठाकरे व शिंदे गटाकडून शक्तिप्रदर्शन करण्यात आले.
मच्छिंद्रनाथ उत्सवाच्या निमित्ताने दोन्ही गटाकडून मोठ्या प्रमाणात बॅनर बाजी रस्त्याने करण्यात आली होती. सकाळीच ठाकरे गटाचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार राजन विचारे, जिल्हा संपर्क प्रमुख सुभाष भोईर यांसह अनेक कार्यकर्ते गडाच्या पायथ्याशी जमले होते. तर शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर, भाऊसाहेब चौधरी, रवी पाटील हे उपस्थित होते. दुपारी १२:३० च्या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गडाच्या पायथ्याशी आले. मुख्यमंत्री येताच शिंदे गटाकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी देखील घोषणाबाजी करत प्रत्युत्तर दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांसह गडावर जात आरती केली. तर ठाकरे गटाचे दानवे, विचारे यांनी देखील गड चढून जात दर्शन घेतले. उत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आला होता.