मुंबई – आज भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचा ६६ वा महापरिनिर्वाण दिन आहे. त्यामुळे बाबासाहेबाना अभिवादन करण्यासाठी शिवाजी पार्क येथील चैत्यभूमीवर लाखो अनुयायांचा महासागर उसळला होता. कोरोनानानंतर २ वर्षांनी प्रथमच निर्बंधमुक्त वातावरणात देशभरातून आलेल्या अनुयायांनी बाबासाहेबांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन घेतलं.
बाबासाहेबांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन घेण्यासाठी मध्यरात्री पासूनच चैत्यभूमीच्या बाहेर मोठी रांग लागली होती. कारण गेली दोन वर्ष कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने सरकारने अनेक निर्बंध लादले होते. त्यामुळे महापरिनिर्वाणदिनी त्यांच्या अनुयायांना चैत्यभूमीवर जाऊन अभिवादन करता आले नव्हते. पण या वर्षी मात्र निबंधमुक्त वातावरणात अभिवादन करायला मिळणार असल्याने चैत्यभूमीवर अफाट गर्दी लोटली होती . मुंबई बाहेरून आलेल्या अनुयायांसाठी महापालिकेने शिवतीर्थावर तसेच चैत्यभूमीवर आवश्यक त्या सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. यात पिण्याच्या पाण्यापासून शौचालये, महिलांसाठी चेंजिंग रूम आदींचा समावेश होता. आज सकाळी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोषारी ,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी, विरोधीपक्षनेते अजित पवार , उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर रामदास आठवले आदी नेत्यांनी चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेबाना आदरांजली वाहिली. महापरिनिर्वाणदिनासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. मुंबई पोलिसांसह राज्य राखीव दल, महिला पोलीस चैत्यभूमी आणि संपूर्ण दादर परिसरात तैनात होते. चैत्यभूमीवर यावर्षीही सामाजिक संघटनांकडून अल्पोपहार, दुपारचे भोजन पिण्याचे पाणी ,वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आले होते. बाबासाहेबांच्या जीवनावरील पुस्तकांचे स्टॉल यावर्षीही लागलेले होते. संध्याकाळी शिवाजी पार्क मैदानावर काही सभांचेही आयोजन करण्यात आले होते.