मुंबई : राज्य सरकारच्या खनिकर्म विभागाने कोकणातल्या लाल मातीचे पुन्हा एकदा सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले. कोकणात सोनाच्या खाणी असल्याचा अहवाल यापूर्वी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाने दिला होता. त्यानंतर आता कोकणात सोन्याच्या खाणींच्या शोधाला वेग आला असून कोकणातल्या मातीची पुन्हा एकदा तपासणी होणार आहे.
कोकणातल्या रेडी, सातेली, तिरोडा, कळणे आणि डेगवे या भागात सोने असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोकणातल्या मातीत खाणकाम करण्याइतके सोन असल्याचा अहवाल कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाने दिला, त्यानंतर आता सरकारी पातळीवर हालचाली वाढल्या आहेत. भूविज्ञान खनिकर्म विभागाला कोकणातल्या मातीचे पुन्हा एकदा नमुने घेण्याचे आदेश देण्यात आले. याविषयी प्रशासनाकडून कोणती अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पण याबाबतचे पत्र विभागाने २१ तारखेलाच काढले असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे येत्या काळात कोकणातल्या मातीत सोने आहे का नाही, याचा पुन्हा एकदा तपास केला जाईल.