सावंतवाडी – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डी.एड.बेरोजगारांचा नोकरीचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.गेल्या १० वर्षात शिक्षक भरती झाली नसल्याने जिल्ह्यातील डी.एड.बेरोजगार देशोधडीला लागण्याची वेळ आली आहे.तरी जिल्हा नियोजन मंडळामार्फत सेवा आयोजन कार्यालयातून गुणवत्तेनुसार स्थानिकांची शिक्षक भरती करावी, अन्यथा आम्ही आमच्या पदविका शासनाला सुपूर्द करू असा आक्रोशवजा इशारा जिल्ह्यातील डी.एड. बेरोजगार समिती प्रतिनिधींनी केला.या समितीने नुकतीच शिक्षणमंत्र्याचे को-ओर्डीनेटर सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षणाधिकारी रत्नाकर धाकोरकर यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.
हे निवेदन देताना डी.एड.संघर्ष समितीचे विजय फाले,सुरेश ताटे,नाना देसाई,शिवा नाटेकर आणि प्रशांत गावकर आदिजण उपस्थित होते.आपल्या निवेदनामध्ये समितीने म्हटले आहे की, वास्तविक शून्य ते २० पटसंख्या असलेल्या मराठी शाळा बंद केल्यास शिक्षक भरती प्रक्रियाच बंद होऊन अतिरिक्त शिक्षकांची संख्या वाढणार आहे. साहजिकच त्याचा परिणाम डी.एड.पदविका पूर्ण केलेल्यांवर होणार आहे.अशा बेरोजगार युवक-युवतींची संक्ग्या वाढणार आहे.तरी शासन निर्णयानुसार,जिल्हा निवड समितीमार्फत जिल्हा स्तरावर स्थानिकांमधून शिक्षक भरती करावी.नाही तर आम्हाला आमच्या डी.एड.पदविका शासनाला परत द्याव्या लागतील. यावेळी धाकोरकर यांनी डी.एड.बेरोजगार समितीचे हे प्रश्न शिक्षणमंत्र्यांच्या कानावर घातले जातील असे सांगितले.