रायगड – जिल्ह्यातील एक नवीन तालुका असलेल्या तळा शहरात ऐतिहासिक समजल्या जाणार्या शिमगोत्सवाला काल शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे.त्यामुळे याठिकाणचे मुंबईकर चाकरमान्यांची आता आपल्या गावाकडे जाण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. तळा शहरात चंडिका ही ग्रामदेवता असून तिचे मूळ स्थान तळेगावच्या कोंडीवर असल्याने तळेगावचा शंकासूर जोगवडीच्या शंकासुराच्या भेटीसाठी होळीच्या एक दिवस आधी येतो. यावेळी दोन्ही शंकासुरांची सलामी पाहण्यासाठी होळीच्या दिवशी जोगवडीत लोकांची मोठी गर्दी दिसून येते.मागील होळीला केलेले नवस फेडल्यानंतर होळी पेटवली जाते.
तळा शहरातील शिमगोत्सवाला जुनी परंपरा लाभली आहे.तळा शहरात बारा वाड्यांच्या होळ्या म्हणजे चाकरमान्यांसाठी विशेष पर्वणीच असते. होळीच्या एक अगोदर साजरी करण्यात येणारी चोर हळकुंड आणि धवचोळ प्रसिध्द आहे. या दिवशी गावकरी जंगलात जाऊन होळीसाठी लाकडे तोडून आणतात. परगण्यातील प्रत्येक गावाचा तमाशा तळा बाजारपेठेत दाखल होतो. यावेळी प्रत्येक घरोघरी जाऊन तमाशा मागितला जातो. गोमुची भूमिका एक पुरुष करतो. गोमू कशी सजली आहे, साडीचा रंग, केसांची रचना, तोंडाची रंगरंगोटी, दागदागिने या सर्वच गोष्टींचे कुतूहल असते. यांशिवाय शंकासुरांची सलामी देखील आकर्षणाचा विषय असतो.