मुंबई – केईएम रुग्णालयाच्या इएनटी विभागात नेझल एंडोस्कोप्स मशीन उपलब्ध झाली आहे. यामुळे, तपासणी, उपचार आणि सर्जिकल सायनस तसेच इतर नाकातील प्रक्रियांची आवश्यक माहिती आणि सविस्तर छायाचित्रे उपलब्ध होणार आहे. आयसीपीए हेल्थ प्रोडक्टस लिमिटेड कंपनीने सीएसआर उपक्रमाचा भाग म्हणून संयोग ट्रस्टच्या मदतीने हे मशीन रुग्णालयाला दिले आहे.
केईएम रुग्णालयाचा ईएनटी विभाग महानगरपालिका रुग्णालयांमधील ईएनटी विभागांपैकी एक सर्वात जुना विभाग आहे. गेल्या दोन दशकांपासून या विभागात मायक्रोसर्जिकल इयर आणि एन्डोस्कोपिक सायनस शस्त्रक्रिया कार्यशाळा घेण्यात येत आहेत. या मशीनमुळे रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांना त्वरित उपचार मिळण्यास मदत होणार आहे. यापूर्वी आयसीपीएने केईएम हॉस्पिटलच्या कार्डीयाक, ऑप्थल्मिक तसेच गॅस्ट्रोइंटेस्टीनल विभागाकरिता चार 2-डी इको (2-D Echo) उपकरणे आणि एक इलेक्ट्रोसर्जिकल युनिट दान केले होते.