पणजी – टाटा मेमोरियल कॅन्सर रुग्णालयात उपचार घेण्यासाठी मुंबईला जाणाऱ्या गावातील कर्क रुग्णांच्या निवासाच्या सोयीसाठी गोव्यातील कळंगुट ग्रामपंचायत मुंबईत घर खरेदी करणार आहे. तसा प्रस्ताव ग्रामपंचायतीने तयार करून तो मंजुरीसाठी सरकारकडे पाठवला आहे, अशी माहिती सरपंच जोसेफ सिक्वेरा यांनी दिली.
कळंगुटमधील रुग्ण आणि त्यांचे कुटुंबीय उपचारासाठी मुंबईतील टाटा मेमोरियल कॅन्सर रुग्णालयात जातात. तेथील राहण्याचा खर्च त्यांना परवडत नाही. त्यामुळे त्यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने वैद्यकीय उपचारासाठी मुंबईला जाणाऱ्या रुग्णांची राहण्याची व्यवस्था करण्यासाठी मुंबईत घर खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ३ ते ४ कोटी खर्च येणार आहे. या खर्चाचा प्रस्ताव ग्रामपंचायतीने तयार करून मंजुरीसाठी सरकारकडे पाठवला आहे. तो संमत झाल्यानंतर ग्रामपंचायत मुंबईत घराची खरेदी करील. यामुळे उपचारासाठी मुंबईला जाणाऱ्या रुग्णांना दिलासा मिळेल, असे सिक्वेरा यांनी सांगितले.