मुंबई- कुर्ला पश्चिमेच्या कोहिनूर सिटी येथील प्रीमियर संकुलातील 12 मजली इमारत क्रमांक 7 मध्ये भीषण आग लागल्याची घटना बुधवारी सकाळी 7 वाजता घडली. इमारतीच्या चौथ्या मजल्यापासून दहावा मजल्यापर्यंत आगीच्या धुराचे लोट पसरल्याने रहिवासी वेगवेगळ्या मजल्यांवर अडकून पडले होते. या आगीत 70 वर्षीय महिला मृत्युमुखी पडली.
शकुंतला रामाणी (70) असे मृत महिलाचे नाव आहे. आग लागल्यानंतर या इमारतीच्या चौथ्या मजल्यापासून दहाव्या मजल्यापर्यंत धूर पसरला. रहिवासी वेगवेगळ्या मजल्यांवर अडकून पडले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करत इमारतीत अडकलेल्या रहिवाशांना सुखरूप गच्चीवर नेले. आग आटोक्यात आल्यानंतर जवानांनी सर्व रहिवाशांना जिन्यावरून सुखरूप खाली आणले. या घटनेत गुदमरल्यामुळे नऊ जणांना त्रास झाला होता. त्यापैकी शकुंतला रामाणीचा मृत्यू झाला. अन्य आठ जण महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयात उपचार घेत आहेत.