वाराणसी – देशातील विश्वनाथाची नगरी काशीमध्ये गंगेच्या काठावरील प्रमुख घाट खचत चालले आहेत. अनेक ठिकाणच्या घाटाच्या पायर्या तुटू लागल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे प्रशासनाने तत्काळ याची दखल घेतली नाही तर हा घाटावरील वारसा नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. गंगेच्या पूर्वेकडे वाळूचे बेट तयार होत आहे.त्याठिकाणी वाळू उत्खनन वाढल्याने घाट जर्जर होत असल्याचे काशी हिंदू विद्यापीठातील महामना शोध संस्थेचे अध्यक्ष प्रा.बी.डी.त्रिपाठी यांनी म्हटले आहे.
गंगेच्या पाण्याच्या दबावामुळे भदैनी, सिधीया,पंचगंगा आणि राजघाटावरील स्थिती अधिक धोकादायक बनली आहे. चेतसिंह घाट, हनुमान घाट खरडला गेला आहे. प्रभूघाट,चौकी घाट, मानमंदिर,मनीकर्णिका आणि पंचगंगा घाटावरील पायर्या आणि प्लॅटफॉर्म खचायला लागले आहेत. दरम्यान,गंगा बेसिन ऑथॉरिटीचे सदस्य राहिलेले प्रा.त्रिपाठी असेही म्हणाले की, गंगेतील प्रदूषणावर काहीच काम झालेले नाही. गंगा खरडली जाणे,गाळ आणि वाळूसाठ्यावरही काम झालेले नाही.