जळगाव,प्रतिनिधी – जिल्ह्यात कापसाला अपेक्षित भाव नसल्याने शेतकऱ्यांनी कापूस विक्री थांबवली आहे. एकीकडे कापसाला भाव नाही नी दुसरीकडे केंद्र सरकारने 11 हजार टन कापसाची
आयात केली आहे.परिणामी व्यापारी शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करीत नाही.त्यामुळे शेतकरी अडचणीत आलेला आहे.त्यावर जिल्ह्याच्या पाचोरा तालुक्यातील भातखंडे खुर्द
येथील शेतकरी नीलकंठ प्रल्हाद पाटील यांनी केंद्र सरकार विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे.
अपेक्षित भाव नसल्याने राज्यभरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कापूस विक्री थांबविली आहे त्यामुळे कापूस कोंडी झाली असून शेतकरी आर्थिक अडचणीत आले
आहेत. ही कोंडी सोडविण्यासाठी व कापसाला 10 हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळावा यासाठी पाटील यांनी खडपीठात याचिका दाखल केली आहे.
नीलकंठ पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की,ऐन हंगामात केंद्र सरकारने 11 हजार टन कापूस आयात केला आहे,त्याचा परिणाम की व्यापारी शेतकऱ्यांकडे कापूस खरेदीस येत नाहीत त्यामुळे कापूस विक्री होत नाही व भावही खाली आले आहेत.राज्याच्या कृषी मंत्र्यांनी केंद्र सरकारकडे कापसाला प्रति क्विंटल 12 हजार 300
तर सोयाबीनला 8 हजार 700 रुपये हमीभाव मिळावा म्हणून पत्र दिले असतांना केंद्राने त्यास प्रतिसाद दिलेला नाही. पाटील यांनी न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर कापूस
उत्पादक शेतकऱ्यांना कापूस विक्रीची घाई करू नका असे आवाहन केले आहे.