नवी दिल्ली- देशभरात १४ फेब्रुवारी हा दिवस काऊ हग डे म्हणून साजरा करावा हे आवाहन केंद्रीय पशुकल्याण मंडळाने ४८ तासात मागे घेतले आहे. १४ फेब्रुवारी हा दिवस जगभरात व्हॅलेंटाइन डे म्हणून साजरा होतो. पण हा दिवस देशात गायीला मिठी मारत प्रेमाचा दिवस म्हणून साजरा करा असे आवाहन अॅनिमल वेल्फेअर बोर्डाने केले होते. यावर देशभरातून विरोधकांकडून टीकेची झोड उठली होती. केंद्राच्या या आवाहनाची खिल्लीही उडवली जात होती. त्यानंतर गायींना मिठी मारण्याचे हे आवाहन मागे घेण्यात येत असल्याचे पत्रक काढण्याची नामुष्की केंद्रीय पशुकल्याण मंडळावर ओढवली आहे.
व्हॅलेटाइन्स डे जगभर प्रेम करण्याऱ्यांसाठी आनंदाचा दिवस असतो. त्याच दिवशी भारतीय संस्कृतीचा दाखला देत पशु कल्याण मंडळाने गायीला मिठी मारण्याचं आवाहन केलं होतं. व्हॅलेंटाइन्स डेच्या दिवशी काऊ हग डे साजरा करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. या आवाहन पत्रकावर सगळीकडून टीका झाल्यानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला आहे.
भारतीय संस्कृतीत आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेत गायीचे स्थान महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांना दूध विक्री आणि शेणखताच्या माध्यमातून आर्थिक उत्पन्न मिळत असतं. गायीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दिवाळीतील वसू बारस हा सण साजरा केला जातो. तर, महाराष्ट्रात बेंदूर हा सण देखील साजरा केला जातो. केंद्राने आधी काढलेल्या पत्रकावर महाराष्ट्रातही मोठी चर्चा घडून आली होती. अखेर केंद्राच्या कक्षेत येणाऱ्या मंडळानं काऊ हग डे संदर्भातील आवाहन मागे घेण्यात आले आहे. दरम्यान, खासदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील या आवाहनाचा आपल्या खास शैलीत समाचार घेतला होता. गायीला मिठी कशी मारायचे त्याचे मार्गदर्शन करा असे आव्हाडांनी सुचवले होते.