संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 25 September 2022

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली – काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ही माहिती दिली. सुरजेवाला म्हणाले की, सोनिया गांधी यांना बुधवारी तापाची काही लक्षणे समोर आल्यानंतर त्यांची कोविड चाचणी करण्यात आली. तेव्हा त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. सोनिया गांधी यांनी स्वतःला घरीच आयसोलेट केली असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, सोनिया गांधी ज्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना भेटल्या होत्या त्यापैकी अनेकांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती सुरजेवाला यांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोनिया गांधी यांच्या काँग्रेस नेत्यांसोबत बैठका सुरू होत्या. या बैठकांदरम्यान त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात असल्याची माहिती काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी दिली आहे. सध्या सोनिया यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती बरी असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, प्रियांका गांधीही त्यांच्या संपर्कात आल्याची माहिती मिळत आहे. सोनिया गांधींचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर प्रियांका गांधी लखनौ दौऱ्याहून माघारी परतल्या आहेत. अद्याप त्यांची कोविड चाचणी करण्यात आलेली नाही. त्याचबरोबर ८ जूनपूर्वी सोनिया गांधी बऱ्या होतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे ८ जून रोजी सोनिया गांधी यांना अंमलबजावणी संचालनालयाने चौकशीसाठी बोलावले आहे. नॅशनल हेराल्डशी संबंधित प्रकरणात ही चौकशी होणार आहे. मात्र हे सूडाचं राजकारण असल्याचा आरोप काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी आणि रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. आम्ही ईडीच्या नोटीशीला घाबरणार नसल्याचेही रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले. तर, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या चौकशीला सामोऱ्या जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami