पुणे – कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकांच्या प्रचाराच्या तोफा आज संध्याकाळी थंडावल्या. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांसह बडे नेते रस्त्यांवर उतरल्याने पोटनिवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचला होता. या निवडणुकांसाठी 26 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून निकाल 2 मार्च रोजी लागणार आहे.
एकनाथ शिंदेंनी दुपारी कसब्यात भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ रोड शो करत मतदारांशी संवाद साधला. त्यावेळी शिंदे म्हणाले की, ‘विरोधकांकडून गलिच्छ राजकारण सुरू आहे. आमची इच्छा होती की, कसब्याची निवडणूक बिनविरोध व्हावी, पण मविआने ते होऊ दिले नाही. आम्ही लोकांना सामोरे जाणारे आहोत. एमपीएससीच्या आंदोलनाला जे यश आले आहे. त्याचे कोणतेही श्रेय आम्हाला द्यायचे नाही. विद्यार्थ्यांची जी भूमिका आहे तीच सरकारची भूमिका असणार आहे.`
देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही मतदारसंघांत हजेरी लावत संपूर्ण दिवस प्रचारात घालवला. कसब्यात काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्यासाठी युवानेते आदित्य ठाकरेंनी रोड शो घेत जोरदार शक्तीप्रदर्शन केले. चिंचवड मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना काटे यांच्यासाठी अजित पवार यांचा रोड शो घेतला आणि त्यानंतर त्यांनी संध्याकाळी पाच वाजता एक पत्रकार परिषद घेतली. तसेच नाना पटोलेंनी आदित्य ठाकरेंसोबत चिंचेची तालिम येथे छोटी सभा घेतली. रस्त्यावर प्रचारसाठी बडे नेते रस्त्यावर उतरल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठा जोश संचारला होता.