पुणे :- पुणे शहरातील कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक रणधुमाळी सुरु आहे. पक्षांच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरु आहे. यामध्ये निवडणूक पूर्व अंदाज, तसेच एक्झिट पोल प्रसारीत करु नये, असे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत.
२६ फेब्रुवारी रोजीच्या सायंकाळी सात वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीस मुद्रीत अथवा इलेक्ट्रॉनिक माध्यम किंवा इतर कोणत्याही माध्यमाद्वारे एक्झिट पोल आयोजित करण्यास अथवा प्रकाशित करण्यास आणि प्रसारित करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयाचे अवर सचिव तथा उपमुख्य निवडणूक अधिकारी शरद दळवी यांनी दिली आहे. लोकप्रतिनिधीत्व कायदा १९५१ च्या कलम १२६ (१) (ब) अन्वये असे करण्यास प्रतिबंध असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.