कल्याण – कल्याणच्या चिंचपाडा परिसरात गेल्या आठवड्यात धुमाकूळ घालून तीन जणांवर हल्ला करून त्यांना जखमी केलेला बिबट्या चक्क भाजीच्या ट्रकमध्ये बसून नाशिकमधून आला होता अशी माहिती आता समोर आली आहे. कारण जिथे बिबट्या दिसला त्या भागात कुठेही जंगल नाही आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील तो बिबट्या असल्याची त्यांच्याकडे नोंदही नाही.हा बिबट्या बाहेरूनच आला असावा अशी माहिती स्थानिक नागरिक देऊ लागले आहेत.
कल्याणमधील स्थानिक नागरिकांनी आणि रेस्क्यू असोसिएशन ऑफ वाइल्ड लाइफ वेल्फेअरचे संस्थापक पवन शर्मा यांनी सांगितले की,भाजी व्यापाऱ्याचा ट्रक ज्यावेळी रस्त्यावर थांबला,
त्यावेळी या बिबट्याने ट्रकमधून खाली उडी मारली असावी. कारण मुळात या भागात कुठेही जंगल नाही, केवळ दुकाने आणि निवासी इमारतीच आहेत.याठिकाणी आतापर्यंत कधीही बिबट्याचे दर्शन झालेले नाही.दरम्यान,सध्या या बिबट्याला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ठेवण्यात आले आहे.तो पुन्हा कुठे गेला तर त्याचा सुगावा लागण्यासाठी त्याच्या शेपटीला चीप बसवली आहे.त्याचे पुढील चांगले वर्तन पाहूनच त्याला जंगलात सोडले जाईल,अशी माहिती उद्यानातून सांगण्यात आली आहे.