कल्याण – कल्याण महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पातून शहरातील ऐतिहासिक काळा तलावाचे सुशोभिकरण करण्यात येत आहे. हे काम नियमितपणे सुरू असल्याने या तलाव परिसरात फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना १ नोव्हेंबर ते ७ डिसेंबरपर्यंत या भागात प्रवेशबंदी करण्यात आली आहे.तसा फलकच या काळा तलावाच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आला आहे.
या तलावाच्या सुशोभिकरण कामांत अडथळा येऊ नये या एकमेव उद्देशाने नागरिकांना प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे.काही जानकर लोकांच्या मते,शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आजोबा आणि शिवसेनाप्रमुखांचे वडील दिवंगत प्रबोधनकार ठाकरे यांचे या काळा तलाव परिसरात काही काळ वास्तव्य होते. त्यांची आठवण म्हणूनच या तलाव परिसरात दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य स्वरूपातील स्मारक उभारण्यात आले आहे.हा तलाव परिसर शहरातील नागरिकांसाठी चांगले विरंगुळा स्थळ बनले आहे. याठिकाणी खुली व्यायामशाळा,ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी जागा तसेच लहान मुलांसाठी विविध खेळाचे साहित्य याठिकाणी उपलब्ध करण्यात आले आहे.त्यात आता आणखी विशेष सुविधा उपलब्ध होणार आहेत.स्मार्ट सिटी प्रकल्पातून तरंगते हॉटेल याठिकाणी उभारण्याचे काम सध्या सुरू आहे.त्या कामासाठी नागरिकांना आता तात्पुरती प्रवेशबंदी करण्यात आली आहे.