पिंपरी, प्रतिनिधी- हिंदूधर्म आणि धर्मवीर छत्रपती संभजी महाराज यांच्याबाबत अवमानकारक वक्तव्य करणारे कर्नाटक काँग्रेसचे नेते सतीश जारकीहोली यांच्याविरोधात पिंपरी-चिंचवड भारतीय जनता पार्टीच्या वतीने निदर्शने करण्यात आली.
कर्नाटक काँग्रेस प्रदेश समितीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोली यांनी हिंदू हा पर्शियन शब्द असून, त्याचा अर्थ अत्यंत घाण आहे. हिंदू हा शब्द आमच्यावर का थोपवला जातोय? असा प्रश्न उपस्थित करीत आक्षेपार्ह विधान केले होते. तसेच, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना दिलेल्या ‘धर्मवीर’ उपाधीचा व मराठ्यांचा अपमान करत धर्मवीर उपाधीसाठी मराठी लायक नाहीत, अशी मुक्ताफळे उधळली आहेत. त्यामुळे महाराष्ट्रासह तमाम हिंदू बांधव आणि शिव-शंभूप्रेमींमधून संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली मोरवाडी येथील मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. काँग्रसेचा नेता जारकीवली याच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले. यावेळी आमदार लांडगे म्हणाले की, हिंदू धर्माबाबत आम्हाला अभिमान आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ही आमची अस्मिता आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीद्वारे अशा बेजबाबदार आणि अवमानकारक व्यक्तव्याचा निषेध होत आहे. शिवप्रेमी तरुणांमध्ये संताप आहे. काँग्रेसच्या ‘त्या’ नेत्याचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करतो.