विजयपुरा – कर्नाटकच्या विजयपुरा येथे गुरुवारी भीषण अपघात झाला. कर्नाटकच्या केंद्रीय राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांच्या कारचा अपघात झाला. एका ट्रकने त्यांच्या कारला मागून जोरदार धडक दिली. या धडकेमुळे ट्रक पलटी झाला तर, कारचे बोनेट तुटले. या अपघातात ज्योती आणि त्यांचा वाहनचालक सुदैवाने बचावले. मात्र, त्यांना किरकोळ दुखापत झाल्याचे सांगण्यात येते.
विजयपुरा येथील नॅशनल हायवे -५० वर गुरुवारी रात्री हा अपघात झाला. निरंजन ज्योती या इनोव्हा कारमधून जात होत्या. तेवढ्यात लोखंडी सळ्यांनी भरलेल्या एका वेगवान ट्रकने कारला मागून जोरदार धडक दिली. यात कारच्या बोनेटचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र, निरंजन ज्योती आणि त्यांच्या वाहनचालकाला मार लागला. दोघांवरही स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले. यावेळी ट्रक चालक मद्यधुंद अवस्थेत होता. भाजपाने आयोजित केलेल्या महिला संमेलनात सहभागी होण्यासाठी निरंजन ज्योती कर्नाटकात गेल्या होत्या.