मुंबई- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मशीद बंदर या रेल्वे स्थानकांच्या दरम्यानचा १५४ वर्षांचा जुना ब्रिटिशकालीन कर्नाक उड्डाणपूल पाडण्यासाठी १९ ते २१ नोव्हेंबर दरम्यान २७ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे ३६ मेल, एक्सप्रेस आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते भायखळा आणि वडाळा दरम्यानची उपनगरी लोकल सेवा बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली.
मध्य रेल्वेवरील कर्नाक पूल धोकादायक बनला आहे. त्यामुळे तो पाडण्यात येणार आहे. त्याचे पाडकाम १९ नोव्हेंबरला रात्री ११ वाजल्यापासून सुरू होणार आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील सीएसएमटी ते भायखळा आणि हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते वडाळा दरम्यानची उपनगरी लोकल सेवा या काळात बंद ठेवली जाणार आहे. हा मेगाब्लॉक १९ ते २१ नोव्हेंबर दरम्यान २७ तासांचा घेण्यात येणार आहे. त्यामुळे या काळात ३६ मेल आणि एक्सप्रेस गाड्या रद्द केल्या आहेत. त्यात मुंबई-पुणे एक्स्प्रेससह अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांचा समावेश आहे. या मेगाब्लॉकमध्ये मुंबई-पुणे इंटरसिटी, डेक्कन, सिंहगड, प्रगती या गाड्या रद्द केल्या आहेत. कर्नाक पूल पाडकाम काळात मध्य रेल्वेच्या बहुतांश लोकल दादरपर्यंत धावतील. हार्बर मार्गावर बहुतांश लोकल फेऱ्या वडाळ्यापर्यंत चालवण्यात येणार आहेत. १९ नोव्हेंबरला रात्री ११ पासून पूल पाडण्याचे काम सुरू होणार असल्याने सीएसएमटी ते भायखळा व सीएसएमटी ते वडाळा दरम्यानची उपनगरी लोकल सेवा बंद ठेवली जाणार आहे, असे रेल्वेने म्हटले आहे.