संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 30 September 2022

कर्ज फेडू न शकल्याने शेतकऱ्याची
विहिरीतच गळफास घेत आत्महत्या

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

भंडारा : पुन्हा एकदा कर्ज कसं फेडू? याच कारणासाठी एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची एक हृदय हेलवणारी घटना भंडाऱ्यातून समोर आली आहे. मनासारखं उत्पन्न न निघाल्यानं देवराम यांच्या मनावर विपरीत परिणाम झाला होता. गेल्या चारपाच दिवसांपासून ते आर्थिक विवंचनेत सापडले होते. दरम्यान गावाशेजारी असलेल्या शेतावरील विहिरीत नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास लावून त्यांनी आपली जीवनयात्रा संपविली. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यात राहणाऱ्या या देवराम तुळशीराम शिंगाडे शेतकऱ्यांच्या आत्महत्येमुळे संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. उन्हाळी धानाचे काही उत्पन्न शेतकऱ्याच्या वाट्याला आले नव्हते. त्यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला. उत्पादनच नाही त्यामुळे कर्जदारांचे कर्ज कसं फेडायची, याची चिंता शेतकऱ्याला सतावत होती. आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्याने अखेर स्वतःच्या शेतावरील विहिरीत गळफास लावून घेत आत्महत्या केली. मृतक देवराम शिंगाडे हे अनेक वर्षापासून शेतीसह पशू व्यवसाय सुद्धा करायचे. या वर्षी तीन एकर जागेत उन्हाळी धानाची रोवणी करून त्यावर जवळपास साठ हजार रुपयाच्या वर पैसे खर्च केले. यासाठी सहकारी संस्थेच्या जवळपास पंचावन्न हजार रूपयांचे कर्ज ही घेतले. मात्र दिवसरात्र मेहनत करूनही तीन एकरात केवळ पंधरा पोती धान उत्पादन झाले. यामुळे देवराम यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान लाखांदूर पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी जावून घटनेचा पंचनामा केला. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी लाखांदूर येथे पाठविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. मात्र या घटनेमुळे आता पुन्हा एकदा शेतकरी आत्महत्येचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami