कर्जत- ‘ रिव्हर राफ्टिंग” एक रोमांचक आणि उत्साहवर्धक असा खेळ आहे. त्यामुळे लहान मुलांपासून अगदी वयोवृद्ध मंडळींपर्यंत रिव्हर राफ्टिंगचे वेड दिसून येते. आता कर्जत तालुक्यातील पेज या बारमाही वाहणार्या नदीमध्ये कर्जत रिसॉर्ट मालक भूमिपुत्र संघटनांच्या सहाय्याने हा रिव्हर राफ्टिंगचा थरार सुरू केला आहे.संघटनेचे अध्यक्ष उदय पाटील यांनी श्रीफळ वाढवला आणि सर्व सदस्यांनी प्रथम पेज नदीमध्ये रिव्हर राफ्टिंग केले.
रायगड जिल्ह्यातील भिरा वीज गृहामधून सोडले जाणारे पाणी हे पुढे कुंडलिका नदिमधून माणगाव तालुक्यात आणि नंतर रोहा तालुक्यातून जाते. त्या नदीवर रिव्हर राफ्टिंग हा साहसी क्रीडा प्रकार १० वर्षापूर्वी सुरू झाला. त्या ठिकाणी रिव्हर राफ्टिंग करणार्या प्रशिक्षित टीमने कर्जत रिव्हर राफ्टिंग टीमकडून कर्जत तालुक्यातील पेज नदीमध्ये रिव्हर राफ्टिंग करण्यासाठी परवानगी घेतली आहे.
पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून रिव्हर राफ्टिंग करणारी टीम कर्जत येथे कार्यरत झाली असून सर्व प्रशिक्षित कर्मचार्यांनी सुरक्षेची संपूर्ण काळजी घेवून पेज नदीमध्ये रिव्हर राफ्टिंगसाठी तीन बोटी आणल्या आहे.या साहसी क्रीडा प्रकारात वाहत्या पाण्याचे तुषार अंगावर घेलत एका वेळेस २४ लोक पर्यटन करू शकतात, अशी व्यवस्था आहे. त्यासाठी रिव्हर राफ्टिंग करण्याची इच्छा असलेल्या पर्यटकांना स्वतःच्या वाहनाने तालुक्यातील भिवपुरी कॅम्प येथील टाटा वीज केंद्र येथे जावे लागणार आहे. शनिवार व रविवार पर्यटकांसाठी सकाळपासून अशी सुविधा आयोजक कर्जत रिसॉर्ट मालक भूमिपुत्र संघटना यांच्याकडून करण्यात येणार आहे.