संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 22 March 2023

कमवा शिका योजनेच्या विद्यार्थ्यांना
आता १०० रुपये रोज मिळणार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

औरंगाबाद – डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कमवा शिका योजनेतून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठ नामविस्तार दिनी कुलगुरू डाॅ.प्रमोद येवले यांनी घोषणा केली. या घोषणेवर बुधवारी शिक्कामोर्तब करण्यात आले. व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत विद्यार्थ्यांना ७० रुपयांऐवजी १०० रुपये प्रती दिवस या हिशोबाने महिनाअखेरीस तीन हजार रुपये मानधन देण्याचे ठरवण्यात आले. हा निर्णय १ एप्रिलपासून पुढील सत्राच्या विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला.
व्यवस्थापन परिषदेची बैठक बुधवारी पार पडली. २०२३-२४ वर्षाच्या अर्थसंकल्पासंबंधीचे वार्षिक नियोजन, वार्षिक लेखे या बैठकीत मांडण्यात आले. या बैठकीला कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, प्र-कुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ. भगवान साखळे, डाॅ. गणेश मंझा, प्रदीपकुमार देशमुख, राज्यपाल नियुक्त सदस्य डाॅ. काशीनाथ देवधर, उच्च शिक्षण सहसंचालक डाॅ. सुरेंद्र ठाकूर, डाॅ. भारती गोरे, इत्यादी उपस्थित होते. निवडणुकीनंतर नवनिर्वाचित अधिसभा सदस्यांची पहिली बैठक १३ मार्च रोजी होणार आहे. या बैठकीत व्यवस्थापन परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. कमवा शिका विद्यार्थ्यांना प्रती दिन १०० रुपये मानधन देण्याचा निर्णय व्यवस्थापन परिषदेत घेण्यात आला असून पुढील आर्थिक वर्षातील विद्यार्थ्यांना हा निर्णय लागू होईल, असे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी सांगितले.
वाढत्या महागाईत कमवा शिका योजनेत काम करूनही शैक्षणिक खर्च भागवून शिक्षण करणे अवघड झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना हातभार लागावा, यासाठी कुलगुरू डाॅ. येवले यांनी नामविस्तार दिनी मानधन वाढीची घोषणा केली होती. त्या घोषणेवर व्यवस्थापन परिषदेत सकारात्मक निर्णय झाल्याने पुढील शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना दरमहा ३ हजार रुपये या योजनेतून मिळू शकतील. सध्या ४८० विद्यार्थी या योजनेत आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या