मुंबई – विक्रोळीच्या कन्नमवार नगरमधील क्रांतिवीर महात्मा जोतिबा फुले रुग्णालयाचा तातडीने पुनर्विकास करावा. रुग्णालयाचा पुनर्विकास होईपर्यंत पर्यायी रुग्णालयाची व्यवस्था करावी, अशी मागणी कन्नमवार नगरच्या रहिवाशांनी पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडे केली आहे. या मागणीचे निवेदन त्यांनी लोढांना दिले.
कन्नमवार नगरच्या महात्मा जोतिबा फुले रुग्णालयाच्या पुनर्विकासात दिरंगाई होत आहे. त्यासाठी अनेकदा निवेदने दिली. परंतु त्यानंतरही या कामाला गती मिळालेली नाही. ६ वर्षांपासून बंद असलेल्या या रुग्णालयात केवळ ठराविक वेळेत ओपीडी चालवली जाते. तेथे पुरेसे डॉक्टर नाहीत. त्यामुळे अनेक रुग्णांना उपचाराअभावी प्राणाला मुकावे लागले. मुख्यमंत्र्यांनी १५ सप्टेंबर २०२२ रोजी आश्वासन दिले होते. मात्र त्यानंतरही रुग्णालयाच्या पुनर्विकासाच्या कामाला गती मिळालेली नाही. म्हणून पालकमंत्री या नात्याने आपण हा प्रश्न त्वरित मार्गी लावावा. आणि या रुग्णालयाचा पुनर्विकास होईपर्यंत येथील नागरिकांसाठी आरोग्याची पर्यायी सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी ‘आम्ही विक्रोळीकरांनी’ पालकमंत्री लोढा यांच्याकडे केली आहे.