औरंगाबाद – औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर तर, उस्मानाबादचे नामांतर धाराशिव असे करण्यात येणार होते. या प्रकरणावर मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला व न्यायाधीश मारणे यांच्या समोर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने तीन प्रश्न उपस्थित करून पुढील सुनावणी १५ फेब्रुवारी रोजी होणार असल्याचे जाहीर केले.
‘नामांतरप्रश्नी हरकती न मागवता निर्णय कसा घेतला ? कार्यालयीन कार्यवाही झालेली नसताना सचिवपदावरील अधिकारी बदलेले नाव कसे वापरतात ? केंद्र सरकारला त्यांची स्थिती काय आहे?’ असे, प्रश्न उच्च न्यायालयाने विचारले. ‘संपूर्ण कारवाई ग्रह मंत्रालयचे १९५३ च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार केली गेली होती असे, केंद्र व राज्य सरकारच्या वकिलांनी चौकशी दरम्यान न्यायालयाला सांगितले. तसेच, पुढील तारखेला या संबंधीची तथ्ये सादर करण्यासाठी न्यायालयाकडे वेळ मागितला.
उस्मानाबाद नामांतर प्रकरणाविरोधात मोहम्मद मुश्ताक, अहमद चाऊस, मसूद शेख, औरंगाबादचे खलील सय्यद यांच्यासह इतर १९ याचिका दाखल असून याप्रकरणी अॅड. प्रज्ञा सतीश तळेकर यांनी तर, औरंगाबाद नामांतर प्रकरणी याचिका कर्त्यांच्यावतीने अॅड. युसूफ मुचाला यांनी बाजू न्यायालयात बाजू मांडली.