औरंगाबाद – औरंगाबाद जिल्ह्यातील पोटूळ रेल्वे स्थानकाजवळ गुरुवारी रात्री १च्या सुमारास देवगिरी एक्स्प्रेसवर सशस्त्र दरोडा पडला. दरोडेखोरांनी तुफान दगडफेक करून औरंगाबादहून मुंबईकडे जाणाऱ्या देवगिरी एक्सप्रेसमधील प्रवाशांना लुटले. त्यात त्यांनी प्रवाशांकडील दागिने, पैसे, मोबाईल असा लाखोंचा ऐवज लंपास केला. या घटनेमुळे प्रवासी प्रचंड घाबरले असून त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
औरंगाबाद येथून मुंबईकडे निघालेली देवगिरी एक्सप्रेस गुरुवारी मध्यरात्रीनंतर १ वाजण्याच्या सुमारास पोटूळ रेल्वे स्थानकाजवळ आली. तिथे सिग्नल नसल्यामुळे ती थांबली. चोरट्यांनी सिग्नलला कापड बांधून ठेवले होते. त्यामुळे तो बंद होता. गाडी थांबताच दरोडेखोरांनी एक्सप्रेसवर जोरदार दगडफेक केली. तिच्या ५ ते ९ या नंबरच्या डब्यांवर दरोडा घातला. त्यात त्यांनी प्रवाशांच्या अंगावरील सोन्याचे दागिने, पैसे आणि मोबाईल चोरले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र तोपर्यंत दरोडेखोर पसार झाले होते. प्राथमिक माहितीनुसार, दरोडेखोर रुग्णवाहिकेतून आले होते. ही रुग्णवाहिका रेल्वे ट्रॅकशेजारी उभी होती. नंतर ती निघून गेली. या घटनेनंतर देवगिरी एक्सप्रेस पुन्हा मुंबईकडे रवाना झाली. मात्र या घटनेने प्रवाशांमध्ये प्रचंड भीती पसरली होती. यापूर्वी जानेवारीत कर्जतमध्ये अशाच प्रकारे दरोड्याचा प्रयत्न झाला होता. मात्र रेल्वे प्रवाशांनी याची माहिती पोलिसांना दिल्यामुळे रेल्वे पोलिसांनी त्यांचा डाव उधळला होता. मात्र देवगिरी एक्सप्रेसवरील दरोड्याच्या घटनेमुळे सुरक्षित रेल्वे प्रवासाबाबत पुन्हा प्रश्न निर्माण झाला आहे.