*उद्योगमंत्र्यांचा रत्नागिरी दौराही रद्द
रत्नागिरी – कोकण रेल्वे मार्गावरील दिवाणखवटी आणि विन्हेरे रेल्वे स्थानकांदरम्यान आज भल्या पहाटे १ च्या सुमारास ओव्हरहेड वायर तुटली. त्यामुळे या मार्गावरील कोकण रेल्वेची सेवा विस्कळीत झाली. कोकण कन्या एक्सप्रेससह अनेक गाड्यांचा खोळंबा झाला. त्या विविध स्थानकांवर अडकून पडल्या. याचा फटका राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनाही बसला. कोकण कन्या एक्सप्रेसमधून ते रत्नागिरीच्या दौऱ्यावर निघाले होते. वीर स्थानकात गाडी रखडल्यामुळे सामंत यांनी दौरा रद्द केला. ते मुंबईला परतले. या घटनेमुळे कोकण रेल्वेच्या प्रवाशांची रात्रभर रखडपट्टी झाली. डिझेल इंजिन जोडल्यानंतर कोकण कन्या एक्सप्रेस रवाना झाली. कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडल्याने सर्व गाड्या उशिराने धावत होत्या.
कोकण रेल्वे मार्गावरील रत्नागिरी जिल्ह्याच्या दिवाणखवटी आणि विन्हेरे रेल्वे स्थानकांदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली. त्यामुळे पहाटे १ वाजल्यापासून कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली. ६ एक्सप्रेस गाड्यांसह सर्वच गाड्या ४ ते ५ तास विविध स्थानकांत रखडल्या. त्या अनेक तास एकाच जागेवर उभ्या होत्या. कोकण कन्या एक्सप्रेस वीर स्थानकात ३.३० तास थांबली होती. उद्योगमंत्री उदय सामंत या ट्रेनमधून रत्नागिरीच्या दौऱ्यावर निघाले होते. त्यांना याचा फटका बसला. तांत्रिक बिघाडामुळे कोकण रेल्वे विस्कळीत झाल्याने शेवटी उदय सामंत यांनी रत्नागिरीचा दौरा रद्द केला. ते मुंबईला परतले. वेरावल-त्रिवेंद्रम एक्सप्रेस, कोकण कन्या एक्सप्रेस, सावंतवाडी एक्सप्रेस, एलटीटी-मडगाव एक्सप्रेस, सीएसएमटी-मेंगलोर एक्सप्रेस, मच्छगंधा एक्सप्रेस आदी गाड्या वेगवेगळ्या रेल्वे स्थानकांमध्ये अनेक तास रखडल्या. शेवटी इलेक्ट्रिकऐवजी डिझेल इंजिन जोडून या गाड्यांची वाहतूक सुरू करण्याचा प्रयत्न कोकण रेल्वेने सुरू केला. मात्र त्यामुळे कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमंडल्याने गाड्या उशिराने धावत होत्या. याचा मोठा फटका कोकण रेल्वेच्या प्रवाशांना बसला.