चेन्नई : इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी ओला इलेक्ट्रिकने तामिळनाडूमध्ये इलेक्ट्रिक लाइट मोटर वाहने सुरू करण्यासाठी ७६१४ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. ओला इलेक्ट्रिकने तामिळनाडू सरकारसोबत हा करार केला आहे. तामिळनाडू सरकारने सांगितले की या गुंतवणुकीत वाहनांची निर्मिती आणि २० गिगावॅट अवर्स क्षमतेचा गिगा प्रकल्प उभारण्याचे लक्ष्य कंपनीने ठेवले आहे.
ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेडने मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्या उपस्थितीत तामिळनाडू सरकारसोबत ७,६१४ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार केला आहे. या करारांतर्गत ७६१४ कोटी रुपयांची गुंतवणूक करून ओला कंपनी इलेक्ट्रिक कार आणि लिथियम सेलच्या उत्पादनाचा प्रकल्प राज्यात उभारणार आहे. या गुंतवणुकीमुळे तामिळनाडूत ३,१११ थेट रोजगार निर्माण होणार आहेत.
ओला ही गुंतवणूक आपल्या ओला सेल टेक्नॉलॉजीज प्रा.ली. आणि ओला इलेक्ट्रिक टेक्नॉलॉजीज प्रा.ली. या उपकंपन्यांच्या माध्यमातून करणार आहे. ७,६१४ कोटींच्या गुंतवणुकीपैकी ओसिटी पुढील पाच वर्षात ५,११४ कोटी तर २५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. यासह दरवर्षी १. ४० लाख चार चाकी वाहनांची निर्मिती करण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे. त्याचबरोबर तामिळनाडू सरकारने आपले इलेक्ट्रिक वाहन धोरणानुसार, ईव्ही उद्योगाला चालना देण्यासाठी ५०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक आणि १.५ लाख नोकऱ्या निर्माण करण्याचे उद्दिष्ट असल्याचेही म्हटले आहे.