जालना-मागील काही दिवसांपासून जालन्यातील व्यापारी कधी आयकर विभाग तर कधी जीएसटी विभागाच्या रडारवर आहेत. काही महिन्यांपूर्वी जालना जिल्ह्यातील विविध व्यापाऱ्यांवर केंद्रीय यंत्रणांनी छापे टाकले होते. काल पुन्हा जालन्यातील व्यापाऱ्यांवर जीएसटी विभागाच्या पथकाने छापेमारी केली आहे. अचानक छापेमारी झाल्याने व्यापारी वर्गात एकच खळबळ उडाली.
जीएसटी विभागाच्या पथकांनी जुना मोठा परिसरात असलेल्या पाच ते सहा होलसेल दुकानावर अचानक छापेमारी केली.अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्यामाहितीनुसार,जुना मोढा परिसरात असलेल्या रमेश हरीराम क्लॉथ सेंटर,आकाश गारमेंट्स, बंजारा केंद्र होलसेल सायकल विक्री व्यापाऱ्यांच्या दुकानांवर ही छापेमारी करण्यात आली. ऐन दिवाळीच्या काळात जालन्यातील बाजारपेठा फुलल्या असताना,गुरूवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास जालन्यात अचानक जीएसटी पथकातील २५ ते ३० अधिकाऱ्यांच्या या धाडी टाकल्या आहे.अचानक धाडी पडत असल्याने काही व्यापाऱ्यांनी दुकाने बंद करून पळही काढला असल्याची माहिती आहे.या धाडीदरम्यान, जीएसटी अधिकाऱ्यांनी बिलांची तपासणी केली या तपासणीत काही बिलांसह महत्वाची कागदपत्रेही ताब्यात घेतल्याची माहिती आहे. दरम्यान, धाडी पडत असल्याची वार्ता शहरात वाऱ्यासारखी पसरली.रात्री उशीरापर्यंत ही कारवाई सुरू असल्याने शहरातील व्यापारी वर्गात एकच खळबळ उडाली आहे.