उरण – उरण तालुक्यातील ऐतिहासिक द्रोणागिरी डोंगराला आठ दिवसानंतर पुन्हा एकदा आग लागल्याची घटना घडली.१६ फेब्रुवारीनंतर परवा शनिवारी सायंकाळी पुन्हा एकदा या डोंगरात वणवा पेटला. ही आग करंजा परिसरातील द्रोणागिरी मंदीर परिसरात लागली होती. द्रोणागिरी डोंगराला खरंच आग लागली आहे, की आग लावली, असा संशय आता व्यक्त केला जात आहे.या आगीत वन्यजीव आणि वनसंपदा खाक झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
उरणमधील द्रोणागिरी हा महत्त्वाचा डोंगर आहे. या डोंगराच्या पायथ्याशीच ओएनजीसीचा देशातील सर्वात मोठा तेलशुद्धीकरण प्रकल्प आहे.त्यामुळे अतिसंवेदनशील डोंगरावर आग लागणे धोक्याचे आहे. त्याचप्रमाणे याच डोंगराच्या पायथ्याशी मोठ्या प्रमाणात लोकवस्ती झाली आहे.हा डोंगर ८०० मीटर उंचीचा असून एकदा वणवा पेटला तर कमी-अधिक वार्यामुळे भडकत असतो. वनविभागाच्या कर्मचार्यांनी स्थानिकांच्या मदतीने हा वणवा विझवण्याचा प्रयत्न केला.
उरणच्या डोंगर आणि जंगल भागात उन्हाळ्यात वणवा लागण्याचे प्रकार ही नित्याचीच बाब असल्याचे सांगितले जाते.विशेष म्हणजे असा वणवा लागल्यास झाडांच्या फांद्या वापरून तो विझवण्याचा प्रयत्न वन विभाग कर्मचारी करत असतात.त्यामुळे अशा आगीत मोठी वनसंपदा नष्ट होत असते.त्यामुळे अशा आगी विझविण्यासाठी काही ठोस उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे मत पर्यावरणवादी व्यक्त करत आहेत.