संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

एसी लोकलमधून प्रवास करणाऱ्या ११ हजार फुकट्या प्रवाशांवर कारवाई

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – एसी लोकल प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन तिकीट दरात ५० टक्के कपात करण्यात आली. त्यामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकल गाडीला प्रतिसाद वाढत आहे. मात्र त्याचवेळी याचाच फायदा घेऊन या लोकलमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे आता रेल्वे प्रशासनही याबाबत खडबडून जागे झाले असून विनातिकीट प्रवाशांविरोधात विशेष मोहीम हाती घेत गेल्या पाच महिन्यांत मध्य आणि पश्चिम रेल्वेने ११ हजार ७११ विनातिकीट प्रवाशांवर कारवाई केली असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, एसी लोकलच्या पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट-विरार दरम्यान दररोज ३२, तर मध्य रेल्वेवर ५६ फेऱ्या होतात. अल्प प्रतिसादामुळे एसीच्या सीएसएमटी ते पनवेल हार्बर आणि ठाणे ते वाशी, पनवेल या ट्रान्स हार्बरवरील वातानुकूलित लोकल फेऱ्या बंद करण्यात आल्या. ५ मेपासून वातानुकूलित लोकलच्या तिकीट दरात कपात केल्यानंतर एसी लोकलला प्रतिसाद वाढू लागला. प्रतिसाद वाढत असल्याने गर्दीचा फायदा घेऊन विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्याही वाढू लागली आहे. काही प्रवाशांकडे वातानुकूलित लोकलचे तिकीट उपलब्ध नसते, तर काही प्रवासी प्रथम किंवा द्वितीय श्रेणीचे तिकीट काढून बिनदिक्कतपणे वातानुकूलित लोकलमधून प्रवास करीत असल्याचे आढळले. तसेच एसी लोकलमध्ये सध्या तिकीट तपासनीस नाहीत. याचाच गैरफायदा काही प्रवासी घेतात आणि बिनदिक्कतपणे प्रवास करतात. अशाप्रकारे पश्चिम रेल्वेवर जानेवारी ते मे २०२२ या काळात एकूण आठ हजार ३६९ विनातिकीट प्रवाशांची धरपकड करण्यात आली. पाच महिन्यांत २९ लाख ४२ हजार ५९९ रुपये दंड वसूल करण्यात आला. मध्य रेल्वेवरही पाच महिन्यांत तीन हजार ३४२ विनातिकीट प्रवाशांची धरपकड करण्यात आली. विनातिकीट प्रवास करणाऱ्या ४७३ प्रवाशांना जानेवारीत, एक हजार ८२१ जणांना एप्रिलमध्ये, तर ६८० जणांना मेमध्ये पकडल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami