संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 04 December 2022

एखाद्यावेळी सूर्य पश्चिमेकडे उगवेल! पण बारामती पवारांना सोडणार नाही

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पुणे : आगामी लोकसभेच्या निवडणुकांसाठी भाजपने शरद पवारांचा गड असणाऱ्या बारामती मतदार संघावर आता लक्ष केंद्रित केले आहे. मात्र अनेकांनी खोदून पाहिले पण पाणी लागले नाही. बारामतीत सूर्य एखाद्यावेळी पश्चिमेकडे उगवेल, परंतु बारामती पवारांना सोडणार नाही, एवढे ते घट्ट नाते आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपला प्रत्युत्तर देत विश्वास व्यक्त केला आहे.

भाजपने काल बारामतीत बैठक घेतली होती. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यावर टीका करण्यात येत आहे. बारामतीमधील जनता कशी आहे याची माहिती आहे. त्यामुळे कोणीही बारामतीत आले तरी एक लाखापेक्षा जास्त मताधिक्य सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांना मिळतेच. एखाद्याचा अश्वमेध रोखल्यावर जो त्रास होतो, तो त्रास शरद पवारांच्या बारामतीत भाजपला होत आहे, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. पुढे ते म्हणाले की, भाजपने सध्या बारामती आणि आमच्यावर लक्ष्य केंद्रीत केले आहे. मात्र थोड्या दिवसात आमचीही योजना मांडू. त्यावेळी कोणकुणाला लक्ष्य करतोय हे तुमच्याही लक्षात येईल.भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना भाजपने विधानसभेचे तिकीट नाकारले होते. ते का नाकारले, याची चर्चा करू इच्छित नाही, परंतु बावनकुळे यांनी पवार साहेबांसारख्या मोठ्या नेत्याबद्दल अशा पद्धतीने बोलणे त्यांना शोभत नाही, असा टोलाही जयंतराव पाटील यांनी लगावला. सत्तेत राहून लोकांची कामे करायची सोडून भाजप नेते अशा तयारीला लागले आहेत. याचा अर्थ भाजपला आपली लोकप्रियता कमी व्हायला लागली असल्याचे लक्षात आले आहे,असा हल्लाबोलही जयंतराव पाटील यांनी केला.

तर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बावन कुळे सोडा, लाख कुळे आली तरी शरद पवारांच्या पायाच्या नखावरची धूळसुद्धा उडणार नाही,असे ट्विट करत भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. दरम्यान, भाजपने लोकसभा निवडणूक २०२४ साठी ‘मिशन ४५’ आखले आहे. पवारांना धक्का देण्यासाठी भाजपने आता बारामतीवर लक्ष केंद्रीत केल्याचे पाहायला मिळत आहे. येत्या २२ ते २४ सप्टेंबरदरम्यान देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन या देखील बारामती दौऱ्यावर येत आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami