नवी दिल्ली :- गेल्या काही दिवसांपासून विमानातील प्रवाशांच्या असभ्य वर्तनाच्या घटना समोर येत आहेत. याच पार्श्वभूमीवर एअर इंडियाने आपल्या विमानात मद्य देण्याबाबतच्या धोरणात बदल केला आहे. सुधारित धोरणानुसार, आता विमान प्रवासात प्रवाशांना मर्यादित प्रमाणात दारू देण्यात येणार आहे. मंगळवारी (२४ जानेवारी) सुधारित धोरणाशी संबंधित बाबी लागू करण्यात आल्या आहेत.
नव्या धोरणानुसार, क्रू मेंबर्सनी सेवा दिल्याशिवाय प्रवाशांना मद्यपान करण्याची परवानगी नसणार आहे. क्रू मेंबर्सनी मद्य प्राशन करणाऱ्या प्रवाशांच्याबाबतीत दक्ष राहावे. मद्यपेय प्रमाणात सर्व्ह करावीत. तसेच, एखादा प्रवाशी वारंवार अल्कोहोलयुक्त पेय मागत असेल, तर त्याला नकार देण्याचा अधिकारही क्रू-मेंबर्सना देण्यात आला आहे.
नोव्हेंबर २०२२मध्ये एअर इंडियाच्या विमानात आपल्या सहप्रवाशावर मद्यधुंद अवस्थेत असलेल्या शंकर मिश्रा याने लघुशंका केली होती. या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि त्यानंतर प्रवाशाचा शोध सुरू केला. अखेर काही दिवसांनी आरोपीला अटक करण्यात आली. एअर इंडिया एयरलाइन्समध्ये अशा घटना वारंवार घडत असल्याने डीजीसीएने मद्य प्रकरणी एअर इंडियाला १० लाखांचा दंड ठोठावला आहे.