नवी दिल्ली :- नॉन फ्लाइंग कर्मचार्यांना टाटा समूहाची एअरलाइन एअर इंडियाने पुन्हा एकदा स्वेच्छा निवृत्ती योजनेची ऑफर दिली आहे. टाटा समुहाने एअर इंडिया ताब्यात घेतल्यानंतर वर्षभरात कर्मचाऱ्यांना अशी दुसऱ्यांदा ऑफर देण्यात आली. स्वेच्छा निवृत्ती ऑफरद्वारे एअर इंडियाला कर्मचार्यांचा खर्च कमी करायचा. त्याशिवाय कर्मचारी कपात टाळण्यासाठी एअर इंडियाने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. एअर इंडियाने ३० एप्रिल पर्यंत कर्मचाऱ्यांना स्वेच्छा निवृत्तीची ऑफर दिली आहे.
स्वेच्छा निवृत्तीची ऑफर ४० वर्ष किंवा त्याहून अधिक वय असणाऱ्या आणि एअरलाईनमध्ये कमीत कमी पाच कायमस्वरुपी वर्ष सेवत असणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी आहे. त्याशिवाय लिपिक किंवा नॉन स्कील श्रेणीतील कर्मचारी ज्यांनी किमान पाच वर्षे सेवा केली असेल ते सु्द्धा स्वेच्छा निवृत्तीची ऑफर स्वीकारू शकतात. एअर इंडियातील जवळपास २१०० कर्मचारी स्वेच्छा निवृत्ती योजनेचा लाभ घेऊ शकतात. १७ मार्च ते ३० एप्रिल २०२३ पर्यंत कर्मचारी स्वेच्छा निवृत्तीसाठी अर्ज करु शकतात. ३१ मार्च २०२३ पर्यंत स्वेच्छा निवृत्तीसाठी अर्ज करणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांना एक्स ग्रॅशिया शिवाय एक लाख रुपये देण्यात येणार आहे. जानेवारी २०२२ मध्ये टाटा समुहाने एअर इंडियाची सुत्रे हातात घेतली. त्यानंतर जून २०२२ मध्ये एअर इंडियाने कर्मचाऱ्यांना स्वेच्छा निवृत्ती योजनेची ऑफर दिली होती. ४२०० पात्र कर्मचाऱ्यांपैकी १५०० जणांनी या योजनेचा लाभ घेतला होता. त्यावेळी त्यांना एक्स ग्रॅशियाशिवाय एक लाख रुपये मिळाले होते.