लंडन – ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी मोठा निर्णय घेतला. भारतीय विद्यार्थी व तरुण व्यवसायिकांना ब्रिटनमध्ये काम करण्यासाठी दरवर्षी ३ हजार व्हिसांना परवानगी दिली. ब्रिटनने अशा प्रकारची पहिलीच योजना एखाद्या देशासाठी तयार केली आहे. जी-२० शिखर परिषदेत पंतप्रधान मोदींसोबत चर्चा केल्यानंतर सुनक यांनी काही तासांत ही घोषणा केली.
भारतीय वंशाच्या ऋषी सुनक यांनी गेल्या महिन्यात ब्रिटनचे पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारला. त्यानंतर जी-२० शिखर परिषदेत त्यांची पहिल्यांदाच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट झाली. त्यावेळी त्यांनी चर्चा केली. या चर्चेनंतर भारतातून इंग्लंडमध्ये येणाऱ्या १८ ते ३० वर्ष वयोगटातील विद्यार्थी आणि भारतीय व्यावसायिकांना २ वर्षांपर्यंत ब्रिटनमध्ये राहण्यासाठी आणि काम करण्यासाठी दरवर्षी ३ हजार व्हिसा दिले जातील, अशी घोषणा केली. या योजनेमुळे भारत आणि इंग्लंड यांच्यातील मैत्री अधिक दृढ होईल. त्यांच्यातील संबंध वृद्धींगत होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ब्रिटनमध्ये शिक्षण घेत असलेल्या एकंदर परदेशी विद्यार्थ्यांपैकी २५ टक्के भारतीय आहेत. भारतीय विद्यार्थी आणि व्यावसायिकांसाठी असा करार करणारा इंग्लंड हा पहिलाच युरोपियन देश आहे. त्यामुळे हा करार महत्त्वाचा मानला जातो.