सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील माढ्यातील बागायतदाराची मध्य प्रदेश व महाराष्ट्राच्या हद्दीवर खून झाला असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.ऊस तोडणीसाठी मजूर आणायला गेलेल्या प्रशांत महादेव भोसले यांची हत्या झाली आहे. मध्य प्रदेशातील सीमेवर एका आदिवासी गावातील मजूर महाराष्ट्रात घेऊन परतत असताना रविवारी ही घटना घडली.
माढा तालुक्यातील बेंबळे येथील प्रशांत महादेव भोसले आपले इतर नातेवाई आणि सहकाऱ्यांसह महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सीमेवरील एका आदिवासी गावात ऊस तोडणीसाठी मजूर आणण्यास स्कॉर्पिओ गाडीतून गेले होते. यासाठी एका मुकादामाशी त्यांची चर्चा देखील झाली असून त्याच्यासोबत मुकादमही होता.यानंतर पैसे देऊन टेम्पोमधून ते मजुरांची टोळी घेऊन येत होते. प्रशांत भोसले हे मजुरांसह टॅम्पोमध्ये होते व त्यांचे सहकारी स्कॉर्पिओ गाडीत होते. काही वेळाने पुढे गेल्याने स्कॉर्पिओ गाडीवर दगडफेक झाली. त्यामुळे त्यांनी गाडी टॅम्पोच्या पुढे नेली आणि वाट पाहू लागले.बराच वेळ टेम्पो न आल्याने स्कॉर्पिओमधील सहकाऱ्यांनी भोसले यांना फोन लावला असता फोन बंद लागत होता. त्यामुळे त्यांनी गाडी परत फिरवली. मात्र तिथे पोहोचताच त्यांना प्रशांत भोसले रक्तबंबाळ झालेल्या अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडलेले दिसले.यावेळी ऊसतोड मजूर टेम्पोसह फरार झाले होते.दरम्यान, प्रशांत भोसले यांना मजुरांनी लोखंडी आणि लाकडी दांडक्याने जबर मारहाण केली होती. त्यानंतर त्यांच्याकडील रक्कम लुटली आणि रस्त्याच्या कडेला फेकून दिले.