उरण – उरण तालुक्यातील बोकडवीरा ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या महाराष्ट्र राज्य वीज मंडळाच्या वायू विद्युत निर्मिती केंद्रात बॉयलरच्या पंपाचा भीषण स्फोट झाल्याची घटना काल रविवारी दुपारी घडली. या एका कनिष्ठ अभियंत्यासह दोन कामगार गंभीररित्या भाजले.प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी नवी मुंबईत हलविण्यात आले असता, उपचारादरम्यान अभियंत्याचा मृत्यू झाला.
या वीज निर्मिती केंद्रात काम करीत असलेले कनिष्ठ अभियंता विवेक धुमाळे,तंत्रज्ञ कुंदन पाटील (रा.उरण डोंगरी),विष्णू पाटील (रा.बोकडवीरा) हे या झालेल्या स्फ़ोटात जबर भाजले होते.त्यांना उपचारासाठी इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले असता प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी दोघांना नवीमुंबईतील ऐरोली येथील रुग्णालयात तर एकाला अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.उपचारादरम्यान कनिष्ठ अभियंता विवेक धुमाळे यांचा मृत्यू झाला.या स्फोटाबाबत अधिक तपास सुरु आहे.काल रविवार असल्याने कामगारांची विशेष वर्दळ नसली, तरी वायू विद्युत निर्मिती संच सुरु असल्याने काही मोजके कामगार कामावर हजर होते.दुपारी १२ ते १२.३० वाजेच्या सुमारास कंपनीच्या बॉयलर विभागात काम सुरु असताना बॉयलरमधील दाब अचानकपणे वाढला.यामुळे बॉयलरला जोडलेला बीसीसी पंम्प सदरचा दाब सहन न करू शकल्याने या पंपाचा जबरदस्त स्फोट झाला.स्फोटचा आवाज जबरदस्त होता.या बॉयलरचे दर २५ वर्षांनी सर्वेक्षण करणे आवश्यक असते, तरी संबंधीत खात्याकडून तपासणी करून दाखला घेतला गेला नव्हता अशी माहिती उघड झाली आहे.