एकच मागणी, आता हवे पिण्याचे पाणी’ चा पुकार
उरण – तालुक्यातील चाणजे ग्रुप ग्रामपंचायतीच्या करंजा गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. इथल्या लोकांना तब्बल २५ ते २८ दिवसांआड पाणी पाणी मिळत आहे.केवळ तासभर मिळणार्या या पाण्यामुळे सात पाड्यातील ग्रामस्थांनी संतप्त होत आता आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.’ एकच मागणी, हवे पिण्याचे पाणी ‘ असा पुकार करत हे ग्रामस्थ १ मार्च रोजी उरण तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढणार आहेत.
या आंदोलना संदर्भात नुकतीच कोंढरी येथे हनुमान मंदिरात ग्रामस्थांची एक विशेष बैठक पार पडली.या बैठकीत या मोर्चाची घोषणा करण्यात आली.३० हजार लोकवस्तीच्या या करंजा गावात आधी १५ दिवसांनी, नंतर २० दिवसांनी आणि आता २८ दिवसांनी तासभर पाणीपुरवठा सुरू आहे. विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षापासुन करंजा सात पाड्यात अपुरा पाणीपुरवठा समस्या जाणवत आहे. केंद्र आणि राज्य सरकारने या भागाच्या पाण्यासाठी आतापर्यंत कोटय़वधी रुपये खर्च केले आहेत.परंतु अद्याप ही समस्या दूर झालेली नाही. त्यामुळेच आता केवळ पाण्यासाठी हा मोर्चाचा पुकार करण्यात आला आहे.
या बैठकीला समाजिक कार्यकर्ते सचिन डाऊर, कामगार नेते भूषण पाटील, सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार,भाजप नेत्या हेमलता पाटील,कुसुम ठाकूर, माजी जिल्हा परिषद सदस्य सीताराम नाखवा,करंजा मच्छिमार सोसायटीचे अध्यक्ष प्रदीप नाखवा, चाणजे ग्रुप ग्रामपंचायत सदस्य रवी कोळी तसेच अन्य ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.