बंगळुरू – किर्लोस्कर सिस्टम्स लिमिटेडचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक व टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रायव्हेट लिमिटेडचे उपाध्यक्ष विक्रम किर्लोस्कर यांचे तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ६४ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी गीतांजली आणि मुलगी मानसी असा परिवार आहे. टोयोटा इंडियाने त्यांच्या निधनाची माहिती दिली.
वाहन उद्योगातील प्रमुख उद्योगपती विक्रम किर्लोस्कर यांनी एमआयटीमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली होती. सीआयआय, एसआयएएम, एआरएआयमध्ये त्यांनी महत्त्वाच्या पदांवर काम केले होते. किर्लोस्कर उद्योग समूहाच्या चौथ्या पिढीतील ते उद्योजक होते. टोयोटाच्या कारला भारतात लोकप्रिय करण्याचे सारे श्रेय त्यांना जाते. कार्यकुशल नेतृत्वाने त्यांनी टोयोटाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. २५ नोव्हेंबरला मुंबईतील टोयोटा कंपनीच्या कार्यक्रमाला ते व्यासपीठावर उपस्थित होते. त्यांच्या निधनाबद्दल राजकीय, सामाजिक आणि उद्योग क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे.