मुंबई- आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आज संध्याकाळी गोरेगाव येथे भरलेल्या उत्तर भारतीयांच्या मेळाव्यात हजेरी लावली. त्यावेळी ‘आम्ही तुमच्या सोबत आहोत, असा विश्वास तेथे उपस्थितीत उत्तर भारतीयांनी उद्धव ठाकरेंना दिला. ‘भाजपात निवडणुकीला सामोरे जाण्याची हिम्मत नाही, आम्ही निवडणुकीसाठी तयार आहोत,
अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, मला बाळासाहेबांचे कोणतेही एक वाक्य किंवा एक शब्द ही काढून दाखवा, ज्यात ते म्हणाले आहेत, आपण हिंदू आहोत म्हणजे फक्त मराठीच, हिंदी भाषिक लोकांचा द्व्ोष करा. आपण हिंदू आहोत, म्हणून आपण एक आहोत, म्हणून मुस्लिम लोकांचा द्व्ोष करा, ते असे कधीही म्हणाले नाही. जे आपल्या देशाच्या विरोधात आहेत, ते कुठल्याही धर्माचे असू द्या, तो जरी हिंदूही असला तरी देशविरोधी काम करत असेल, तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे. हे बाळासाहेबांचे विचार होते आणि हेच आमचे हिंदुत्व आहे.