उत्तरकाशी – केदारनाथनंतर उत्तरकाशीच्या हिमस्खलनातील मृत गिर्यारोहकांची संख्या १० झाली आहे. २३ जण अजूनही बेपत्ता आहेत. ८ जणांना वाचवण्यात यश आले आहे. “द्रौपदी का डंडा-२’ या पर्वत शिखरावर चढाई करताना मंगळवारी सकाळी ८.३० च्या सुमारास ही दुर्घटना घडली. खराब हवामानामुळे मदत व बचावकार्यात अडथळे येत आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली.
उत्तर काशीत “द्रौपदी का डंडा-२’ हे सुमारे ५ हजार ६ मीटर उंचीचे पर्वत शिखर आहे. नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनेरिंगचे प्रशिक्षणार्थी गिर्यारोहक आणि प्रशिक्षक मंगळवारी त्यावर चढाई करण्यासाठी गेले होते. त्यावेळी हिमस्खलन झाले. त्यात १० गिर्यारोहकांचा मृत्यू झाला. ते सर्वजण प्रशिक्षणार्थी आहेत. या दुर्घटनेत अजूनही २३ जण बेपत्ता आहेत. त्यात ७ प्रशिक्षकांचा समावेश आहे. लष्कर आणि पोलिसांचे बचाव पथक अडकलेल्या गिर्यारोहकांना बाहेर काढण्याचे काम करत आहेत. मात्र खराब हवामानामुळे बचाव कार्यात अडचणी येत आहेत. गेल्या काही दिवसांत झालेले हे तिसरे मोठे हिमस्खलन आहे.