डेहराडून- उत्तराखंड औषध नियमकाने ३ दिवसांत घुमजाव केले. योगगुरु बाबा रामदेव यांच्या पतंजलीच्या ५ औषधांवर घातलेली बंदी मागे घेतली. प्राधिकरणाने घाईघाईत चुकीचा निर्णय घेतला होता. त्यामुळे तो मागे घेतला, असे स्पष्टीकरण उत्तराखंड सरकारने दिले.
योगगुरु बाबा रामदेव यांच्या दिव्य फार्मसीने तयार केलेल्या ५ औषधांवर उत्तराखंड सरकारने ३ दिवसांपूर्वी बंदी घातली होती. उत्तराखंड आयुर्वेद आणि युनानी परवाना प्राधिकरणाने त्याची माहिती ३ दिवसांपूर्वी दिली होती. रक्तदाब, मधुमेह, काचबिंदू आणि उच्च कोलोस्ट्रॉलवर ही औषधे प्रभावी असल्याचा दावा केला जातो. या औषधांच्या जाहिराती दिशाभूल करणाऱ्या आहेत, असा ठपका ठेवून त्यांनी मधुग्रीट, थायरोग्रीट, बीपीग्रीट, लिपिडोम टॅबलेट आणि आयग्रीट गोल्ड टॅबलेट या ५ औषधांवर बंदी घातली होती. ९ नोव्हेंबरला राज्य प्राधिकरणाने हा बंदी आदेश काढला होता. परंतु आता ३ दिवसांनी उत्तराखंड सरकारने घुमजाव केले. ९ नोव्हेंबरच्या आदेशात आम्ही सुधारणा केली आहे. त्यानुसार पतंजलीची ही औषधे पूर्वीप्रमाणे सुरू ठेवण्यास आम्ही परवानगी देतो, असे उत्तराखंड औषध नियामक डॉ. जीसीएन जंगपांगी यांनी सांगितले. पूर्वीचा आदेश आम्ही घाईघाईने जारी केला होता. त्यात चूक झाली होती, अशी कबुली देऊन त्यांनी नवीन आदेशात बाबा रामदेव यांच्या पतंजलीच्या ५ औषधांवरील बंदी मागे घेतली असल्याचे सांगितले.