बारामती – कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याला विरोधी पक्षाचे नेते अजित पवार यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. खेड्यापाड्यातील शाळा बंद करण्याचा हा “ईडी’ सरकारचा डाव आहे, असा घणाघाती आरोप त्यांनी केला. “ईडी’ म्हणजे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकार असा त्याचा अर्थ असल्याचे त्यांनी यावेळी सांगून टाकले.
काही जण शिक्षणाच्या मुळावर उठले आहेत. अपुरी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हा “ईडी’ सरकारचा डाव आहे. ईडी सरकार म्हणजे एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र फडणवीस असा त्याचा अर्थ आहे, असे अजित पवार यांनी सांगितले. सरकारच्या या निर्णयाचा फटका लाखो गरीब विद्यार्थ्यांना बसणार आहे. गरीब आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना त्याची जबर किंमत मोजावी लागणार आहे. शिक्षणापासून ते वंचित राहण्याची भीती आहे. कमी पटसंख्या असलेल्या शाळा बहुतांश आदिवासी आणि दुर्गम भागात आहेत. तेथे गरीब आणि आदिवासी विद्यार्थी शिकतात. अशा शाळा बंद करून सरकार काय साध्य करणार आहे? असा सवाल त्यांनी विचारला. मी अर्थमंत्री होतो. आर्थिक शिस्त पाळणारा आहे. माझ्या जवळचा चुकला तरी चुकलं म्हणणारा आहे. पण अशी कामे मी कधी केली नाहीत. विरोधी पक्ष म्हणून सभागृहात याच्या विरोधात मी आवाज उठवणार आहे. पुरोगामी महाराष्ट्रामध्ये शाळा बंद होऊ नयेत यासाठी आपण काम केले पाहिजे. दीपक केसरकर यांनी गृहपाठ बंद केला. त्याला सर्व स्तरातून विरोध होत आहे. गृहपाठ नसेल तर मुले काय करणार? त्यांचे तर डिवाळ निघेल. एक तर पहिलीपासून सातवीपर्यंत परीक्षा नाही. असे धोरण असताना गृहपाठ बंद करण्याचा निर्णय आत्मघाती आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.