मुंबई – गोरेगावातील पत्राचाळ प्रकरणात न्यायालयाने ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना जामीन मंजूर केला आहे. मात्र संजय राऊत यांच्या जामिनाला ईडीचा विरोध आहे. संजय राऊत यांच्या जामिनाविरोधात ईडीने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.आता या प्रकरणात ईडीच्या याचिकेवर संजय राऊत यांनी आपले उत्तर मुंबई उच्च न्यायालयात शपथपत्राच्या स्वरुपात सादर केले आहे. या शपथपत्रामध्ये संजय राऊत यांनी भाजप आणि शिंदे गटावर अप्रत्यक्षपणे गंभीर आरोप केले आहे. संजय राऊत यांच्या जामिनाविरोधात ईडीने दाखल केलेल्या याचिकेवर १२ डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे.त्यापूर्वी संजय राऊत यांनी न्यायालयात शपथपत्र सादर केले आहे.
राज्यातील राजकीय परिस्थिती बदलल्यानंतर राजकीय शत्रुत्वामुळे आपल्याला अटक करण्यात आल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. बदललेली राजकीय परिस्थिती हीच आपल्या अटके मागचे मुख्य कारण असल्याचा दावा राऊत यांनी प्रतिज्ञापत्रात केला आहे. गोरेगावातील पत्राचाळीचा पुनर्विकास हा प्रत्येक राजकीय पक्ष आणि नेत्याला हवा होता. म्हणूनच पत्राचाळीच्या पुनर्विकासासाठी आयोजित बैठकांना आपण हजर होतो. कोणत्याही प्रकल्पावरील चर्चेच्या बैठकीत सहभागी होणे हा गुन्हा ठरत नाही. या प्रकरणात गुन्हा झाल्याचे सिद्ध करणारे पुरावे नसतानाही आपल्याला अटक करण्यात आली. राजकीय सुडबुद्धीने ही कारवाई करण्यात आली, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.