इस्लामाबाद- खैबर-पख्तूनख्वा प्रांतातील डेरा इस्माईल खान कस्बे जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदतीचे धनादेश वाटपासाठी गेलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे रावळपिंडीजवळ त्याचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. त्यानंतर ते मोटारीतून इस्लामाबाद जवळच्या आपल्या निवासस्थानी पोहोचले. हा त्यांच्या हत्येचा कट होता, असा आरोप खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्षाने केला आहे.
माजी पंतप्रधान इम्रान खान डेरा इस्माईल जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदतीचे धनादेश वाटण्यासाठी गेले होते. तेथून परतताना त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे ते रावळपिंडीजवळच्या अदियाला गावात तातडीने उतरवले. नंतर खान रस्तेमार्गे मोटारीने इस्लामाबाद येथील आपल्या घरी पोहोचले. त्यांच्या हेलिकॉप्टरमधील तांत्रिक बिघाड हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय त्यांच्या पक्षाने व्यक्त केला आहे. गेल्या महिन्यात खराब हवामानामुळे खान यांच्या विमानाचे तातडीने लँडिंग झाले होते. त्यानंतर आता त्यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग झाल्यामुळे हा घातपाताचा कट असल्याचा आरोप पक्षाने केला आहे. विशेष म्हणजे या घटनेपूर्वी एक दिवस अगोदर इम्रान खान यांनी पंजाब प्रांतातील मेळाव्यात आपल्या हत्येचा कट रचला जात असल्याचा गंभीर आरोप केला होता.